Rashmi Mane
ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. लेबर पार्टीचे किअर स्टारमर यांनी 650 पैकी 400 जागा पार केल्या आहेत.
लेबर पक्षाने 14 वर्षांनंतर जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे लेबर पार्टीचे नेते किअर स्टारमर हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होणार आहेत.
ब्रिटनमधील निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये लेबर पार्टीला 410 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार निकाल लागले आहेत.
अर्थव्यवस्थेतील मंदी, ढासळत चाललेल्या सार्वजनिक सेवा आणि घसरलेले जीवनमान यासारख्या कठीण आव्हानांना तोंड देत किअर स्टारमरचा लेबर पक्ष सत्तेवर आला आहे.
ऋषी सुनक यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरण्याचे कारण म्हणजे बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यात अपयश, कोरोना महामारीच्या काळात कमकुवत झालेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यात असमर्थता.
ब्रिटनमध्ये गृहनिर्माण ही मोठी समस्या आहे तसेच या निवडणुकीतही मोठा मुद्दा आहे. सुनक यांचा पक्ष या समस्येला सामोरे जाण्यात अपयशी ठरले. लेबर पक्षाने निवडणूक प्रचारादरम्यान या समस्येचे भांडवल केले. लेबर पक्षाने आपल्या गृहनिर्माण योजनेंतर्गत लाखो नवीन घरे बांधण्याचा रोड मॅप तयार केला आहे.
ऋषी सुनक सरकारला गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी घटना रोखण्यात म्हणावे तितके यश मिळालेले नाही. अलिकडच्या काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यांनी सध्याच्या सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
किअर स्टारमर चार वर्षे विरोधी पक्षाचे नेते होते. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे अपयश आणि त्याविरोधात निर्माण झालेली नाराजी त्यांनी अगदी जवळून पाहिली आणि त्याचा उपयोग आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी केला. त्यांच्या मजूर पक्षाने 'सत्ता आणि अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी लेबर पक्षाला मतदान करावे', असा नारा दिला.