Rashmi Mane
केंद्र सरकारचे कर्मचारी महागाई भत्त्याच्या (DA) घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. एप्रिल महिना संपत आला तरीही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संभ्रम आणि चिंता वाढली आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता दिला जातो. पहिली वाढ जानेवारीत आणि दुसरी जूनमध्ये केली जाते. मात्र, प्रत्यक्षात जानेवारीतील वाढ मार्च-एप्रिलमध्ये जाहीर होते.
यावेळी एप्रिलपर्यंतही DA बाबत कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे यंदा वाढ होणार की नाही, असा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
२०२५ मध्ये २८ मार्चला DA वाढ जाहीर झाली होती. २ एप्रिलला आदेश आणि ३ एप्रिलला अधिसूचना काढण्यात आली होती. यंदा मात्र अशी कोणतीही हालचाल दिसत नाही.
तज्ज्ञांच्या मते, यावेळी DA मध्ये सुमारे २% वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याचा ५८% DA वाढून ६०% होऊ शकतो.
महागाई भत्ता AICPI-IW या निर्देशांकावर आधारित असतो. मागील १२ महिन्यांच्या सरासरीवर DA निश्चित केला जातो. त्यामुळे आकडेवारीनुसार वाढ अपेक्षित आहे.
DA वाढीला उशीर होण्यामागे प्रशासकीय प्रक्रिया, मंजुरीतील विलंब आणि संभाव्य आठवा वेतन आयोग ही कारणे सांगितली जात आहेत. अधिकृत माहिती मात्र अद्याप नाही.
कोविड काळात DA थांबवण्यात आला होता, पण सध्याची परिस्थिती तशी नाही. आर्थिक दबाव असला तरी DA पूर्णपणे थांबवला जाण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.