Pradeep Pendhare
पालक सफाई कामगार, कचरा वेचक किंवा धोकादायक स्वच्छता कामात आहात? तर त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते. विशेष म्हणजे यासाठी जात-धर्माची किंवा उत्पन्नाची अट नाही.
'साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती', असे या योजनेचे नाव आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त निधीतून ही योजना राबवली जाते.
हाताने मैला उचलण्याच्या कामात गुंतलेल्या व्यक्तींची मुले, कातडी सोलणे आणि कातडी कमावण्याचे काम करणाऱ्यांची मुले, कचरा वेचणाऱ्या व्यक्तींची मुले आणि आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या स्वच्छता कामात गुंतलेल्या पालकांची मुलांना शिष्यवृत्ती मिळू शकते.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त शाळेत पूर्णवेळ शिक्षण घेतलेले असावे. तसेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरीपासून लाभ मिळू शकतो.
वसतिगृहात न राहणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन हजार रुपये, तर इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या परंतु वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी आठ हजार रुपये मिळतात.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे पालक कोणत्याही जाती-धर्माचे असले, तरी पात्र व्यवसायात गुंतलेले असल्यास त्यांच्या मुलांना लाभ मिळतो. तसेच कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही.
पालकांच्या व्यवसायाचे अधिकृत प्रमाणपत्र, विद्यार्थ्याची शाळेतील प्रवेश आणि शैक्षणिक माहिती, विद्यार्थ्याचे आधार व बँक खात्याचा तपशील आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील पालकांच्या मुलांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन अर्ज भरला जातो. शिष्यवृत्तीची रक्कम DBT द्वारे बँक खात्यात जमा होते.
विद्यार्थ्याची प्रत्येक शैक्षणिक वर्षातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक आहे. पहिली ते दहावीच्या शिक्षणासाठी दुसरी शिष्यवृत्ती एकाच वेळी घेता येत नाही.