Pradeep Pendhare
ब्लाउज, ड्रेस, गणवेश शिवणे किंवा कपड्यांची दुरुस्ती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी सरकारच्या काही योजना आहेत. त्यातून कौशल्यविकास, आधुनिक साहित्य आणि व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळू शकते.
पारंपरिक शिंपी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेत ‘टेलर’ या व्यवसायाचा समावेश आहे. पात्र कारागिरांना प्रशिक्षण, टूलकिट आणि सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सुविधा मिळते.
पीएम विश्वकर्मा योजनेत पात्र शिंपी कारागिरांना आधुनिक टूलकिट खरेदीसाठी 15 हजार रुपयांपर्यंत ई-व्हाउचर मिळू शकते. यामुळे शिवणकामासाठी आवश्यक साधने घेण्यास मदत होते.
योजनेअंतर्गत मूलभूत प्रशिक्षण 5 ते 7 दिवसांचे, तर प्रगत प्रशिक्षण 15 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीचे असू शकते. प्रशिक्षणाच्या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना दररोज 500 रुपये विद्यावेतन दिले जाते.
पीएम विश्वकर्मा योजनेत दोन टप्प्यांत विनातारण कर्जाची सुविधा आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख, अटी पूर्तातानंतर 2 लाख रुपये कर्ज मिळते. लाभार्थ्यांसाठी व्याजदर 5 टक्के आहे.
स्वतःचा नवीन शिवणकाम किंवा कपडे तयार करण्याचा उद्योग सुरू करायचा असेल, तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा (PMEGP) विचार होऊ शकतो. यात अनुदानाची तरतूद आहे.
महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय महिलांसाठी स्वर्णिमा योजनेत स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदतीची तरतूद आहे. स्वयं-सहायता गटाच्या प्रकल्पासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा आहे.
योजनेनुसार कागदपत्रे लागतात. साधारणपणे आधार कार्ड, बँक खाते तपशील, मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा, व्यवसायाची माहिती आणि आवश्यकतेनुसार जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला किंवा प्रकल्प अहवाल लागू शकतो.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी जवळच्या CSC केंद्रातून किंवा अधिकृत पोर्टलवर नोंदणी करता येईल. PMEGP साठी अधिकृत PMEGP पोर्टलवर आणि स्वर्णिमा योजनेसाठी जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज करता येईल.