Rashmi Mane
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून त्यांनी आज शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी शपथविधी सोहळ्यात संस्कृत भाषा निवडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
पंजाबमध्ये जन्मलेले आणि हिंदी माध्यमातून शिक्षण घेतलेले देवव्रत यांनी संस्कृत निवडून एक वेगळाच संदेश दिला.
संविधानानुसार राज्यपालांना शपथ कोणत्याही अधिकृत भाषेत घेता येते. बऱ्याचदा राज्यपाल इंग्रजीत शपथ घेतात. काहीजण स्थानिक भाषेला प्राधान्य देतात. पण महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी संस्कृतची निवड केली.
आचार्य देवव्रत यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, संस्कृत ही वेदांची आणि देवांची भाषा आहे. संस्कृत हीच सर्व भाषांची जननी आहे. इतकेच नव्हे तर संगणकही संस्कृत भाषेला सर्वात चांगल्या प्रकारे समजतो. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास करणे ही मोठी गौरवाची बाब आहे.
संस्कृत ही केवळ धार्मिक किंवा शास्त्रीय भाषा नाही तर भारतीय ज्ञानपरंपरेचा खजिना आहे. शपथविधी सारख्या प्रसंगी या भाषेचा वापर करून त्यांनी एक सकारात्मक आदर्श घालून दिला आहे.
आचार्य देवव्रत हे मूळचे हरियाणातील रोहतक जिल्ह्यातले आहेत. त्यांचे शिक्षण गुरुकुल पद्धतीत झाले असून आयुष्यावर आर्य समाज आणि स्वामी दयानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. ते कुरुक्षेत्रातील गुरुकुल विद्यापीठात प्राचार्य म्हणून कार्यरत होते.
त्यांचा आर्य समाजाच्या शिकवणीशी जवळचा संबंध हा महत्त्वाचा मुद्दा आहे. संस्कृत भाषेच्या अभ्यासक म्हणून त्यांनी सदैव भारतीय परंपरेचे आणि संस्कृतीचे जतन करण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतानाही त्यांनी संस्कृत भाषा निवडली असावी.