Rajanand More
ग्वाल्हेर येथील शिंदे राजघराणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांच्या तब्बल 40 हजार कोटींच्या वारसाहक्काने आलेल्या संपत्तीवर हायकोर्टाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे.
घराण्यातील सर्व सदस्यांनी 90 दिवसांच्या आता संपत्तीच्या वादावर सर्वसंमतीने एकमत करावे, असे कोर्टाने म्हटले आहे. मागील दोन दशकांहून अधिक काळापासून हा वाद सुरू आहे.
सुरूवातीला माधवराव शिंदे पक्षकार होते. त्यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य हे पक्षकार बनले. त्यांच्यासह वसुंधरा राजे, यशोधरा राजे आणि उषा राजे यांना कोर्टाच्या आदेशानुसार एकत्रित मार्ग काढायचा आहे.
जिवाजीराव शिंदे आणि महाराणी विजयाराजे शिंदे यांचा वारसा पुत्र माधवराव आणि तीन कन्या वसुंधरा राजे, यशोधरा राजे आणि उषा राजे यांच्याकडे आला. आता त्यांच्यात संपत्तीचा वाद सुरू आहे.
संपत्तीमध्ये ग्वाल्हेर येथील ऐतिहासिक जय विलास पॅलेस आहे. तो तब्बल 40 एकर परिसरात आहे. ग्वाल्हेरमधील राणी महल, हिरनवन कोठी, विजय भवन, शांतीनिकेशन आदी संपत्तीचा समावेश आहे.
महाराष्ट्रात श्रीगोंदा व अन्य काही ठिकाणी जमीन, मुंबईत समुद्र महलाचाही समावेश आहे. या संपूर्ण संपत्तीची किंमत तब्बल 40 हजार कोटी सांगितली जाते.
संपत्तीतील प्रमुख वारसदार असलेले ज्योतिरादित्य हे सध्या भारतीय जनता पक्षात असून मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये सक्रीय होते.
वसुंधरा राजे याही भाजपमध्ये सक्रीय आहेत. त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. तर यशोधरा राजे याही मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री राहिल्या आहेत.