Rashmi Mane
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घरावर तिरंगा फडकवण्याची तयारी करताय? राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहिता, २००२ आणि संबंधित कायद्यात काही महत्त्वाचे नियम आहेत.
राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी केवळ १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीचीच गरज नाही. योग्य सन्मान राखून नागरिक कोणत्याही दिवशी तिरंगा फडकवू शकतात.
२०२२ मधील बदलानुसार घराच्या छतावर किंवा उघड्यावर लावलेला राष्ट्रध्वज दिवस-रात्र म्हणजे २४ तास फडकवता येतो. मात्र ध्वजाची प्रतिष्ठा आणि स्थिती चांगली ठेवणे आवश्यक आहे.
राष्ट्रध्वजासाठी कापूस, पॉलिस्टर, लोकर, रेशीम किंवा खादीचा वापर करता येतो. हाताने विणलेला किंवा मशीनने तयार केलेला ध्वजही नियमांनुसार वापरता येतो.
तिरंगा नेहमी सर्वोच्च आणि सन्मानाच्या स्थानावर असावा. त्याच्या वर किंवा त्याच पातळीवर दुसरा ध्वज लावू नये. एकाच खांबावर दुसरा ध्वजही लावता येत नाही.
मळलेला, फाटलेला किंवा चुरगळलेला राष्ट्रध्वज फडकवणे टाळा. तसेच तिरंग्याचा वापर फुले, हार किंवा इतर सजावटीच्या वस्तूंनी सजवण्यासाठी करू नये.
तोरण, पताका, टेबल किंवा मंच झाकण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करता येत नाही. खासगी वाहनांच्या बॉनेट किंवा छतावरही तिरंगा लावण्यास नियमांनुसार परवानगी नाही.
राष्ट्रध्वज जाणीवपूर्वक जमीन, फरशी किंवा पाण्याला टेकणार नाही याची काळजी घ्या. तिरंगा फडकवताना प्रत्येक भारतीयाने त्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपणे हीच खरी देशभक्ती आहे.