Rajanand More
अमेरिकेत पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकीत दोन्ही सभागृहात रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. डेमोक्रेटिक पक्षाला दोन्ही सभागृहात बहुमत मिळाले आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचे दोन्ही सभागृहात बहुमत संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता त्यांचे सहकाही त्यांना सोडून जाण्यास सुरुवात झाली आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाच्या नागरी हक्क विभागाच्या प्रमुख हरमीत कौर धिल्लन यांनी निवडणूक निकालानंतर काही तासांतच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अटर्नी जनरल टॉड ब्लँश यांनी गुरुवारी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.
धिल्लन या भारतीय वंशाच्या अमेरिकेतली प्रसिध्द वकील आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या पराभवानंतर ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडणाऱ्या त्या पहिल्या वरिष्ठ अधिकारी ठरल्या आहेत.
नागरी हक्क विभागाच्या प्रमुख म्हणून धिल्लन यांनी मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण आणि वांशिक भेदभावाच्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या विभागाच्या कामकाजात बदल केले.
धिल्लन यांच्या कार्यकाळात विद्यापीठांच्या परिसरातील कथित यहुदीविरोधी घटनांची चौकशी तसेच शस्त्र बाळगण्याच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणांवरही विभागाने लक्ष केंद्रित केले.
विभागाच्या नव्या धोरणांवरून मतभेद निर्माण झाल्याने अनेक अनुभवी सरकारी वकिलांनी यापूर्वीच विभाग सोडला आहे. काही वकिलांवर उदारमतवादी विचारसरणीवरून आणि ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांना विरोध करण्याचा आरोप धिल्लन यांनी केला होता.
धिल्लन यांनी ऑक्टोबरमध्येच व्हाइट हाऊसला पद सोडण्याचा निर्णय कळवला होता. त्या पुन्हा आपल्या ‘द धिल्लन लॉ ग्रुप’ या फर्ममध्ये काम सुरू करणार आहेत.