Rashmi Mane
यूपीएससी परीक्षेत यश मिळवणे हे देशातील लाखो तरुणांचे स्वप्न असते. मात्र या कठीण प्रवासात अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो.
तरीही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अपयशाला न जुमानता यश मिळवता येते, याचं उदाहरण म्हणजे हर्षिता गोयल.
हरियाणामधील मूळ रहिवासी आणि गुजरातमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या हर्षिता यांनी यूपीएससी 2024 मध्ये दुसरी रँक मिळवून देशभरात आपली छाप पाडली आहे.
हर्षिता या चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांनी बडोद्याच्या एम.एस. युनिव्हर्सिटीतून बी.कॉम पदवी घेतली होती. शैक्षणिक प्रवास पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात उत्तम करिअर घडवले.
मात्र त्यांचे स्वप्न केवळ आर्थिक यशापर्यंत मर्यादित नव्हते. समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
कुटुंबाच्या साथीनं आणि आईवडिलांच्या प्रेरणेनं हर्षिता यांनी हा कठीण अभ्यासाचा प्रवास पार केला. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले नाही, तरी हार न मानता सातत्याने मेहनत घेत राहिल्या.
अखेर त्यांच्या चिकाटीला यश आलं आणि त्यांनी संपूर्ण देशात दुसरी रँक मिळवली. हर्षिता गोयल आपल्या कुटुंबातील पहिल्या आयएएस अधिकारी ठरल्या आहेत. लहानपणापासून समाजसेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हर्षिता आता महिलांना सशक्त करण्यासाठी काम करणार आहेत.