Rashmi Mane
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत खिंडार पडले आहे. भाजप नेते व माजी सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.
गेली 40 वर्ष राजकारणात सक्रिय असणाऱ्या पाटलांना राजकारणाता बाळकडू घरातूनच मिळाला. काँग्रेसचे माजी खासदार शंकरराव पाटील हे त्यांचे काका होते. त्याकडून राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाला.
हर्षवर्धन पाटलांचे शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण भिगवणमध्ये घेतलं. एलएलबीचं शिक्षण घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं मराठीसह हिंदी आणि इंग्रजीवरही प्रभुत्व आहे. पुणे जिल्हा परिषदेत सदस्य इथपासून हर्षवर्धन पाटलांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
1992 मध्ये पहिल्यांदा पुणे जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्याचवेळी ते पुणे जिल्हा सहकारी संघावर (कात्रज) निवडून आले होते.
पहिलीच निवडणूक जिंकलेल्या पाटलांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाचीही लॉटरी लागली. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये ते शिवसेनेतून राज्यमंत्री झाले. त्यांच्याकडे कृषी व जलसंधारण खात्याचा कारभार होता.
1999 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यातही ते विजयी झाले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला पाठिंबा दिला. मात्र, जंबो मंत्रिमंडळामुळे अवघ्या दीडच दिवसात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण 2002 मध्ये शेकापने सरकारचा पाठिंबा काढून घेतला, त्यावेळी अपक्षांना मंत्री करण्यात आले. त्यात ते कॅबिनेटमंत्री झाले.
काँग्रेसच्या पाठिंब्यावर हर्षवर्धन पाटील यांनी 2004 मध्ये पुन्हा अपक्ष निवडणूक लढवली. त्यात पुन्हा विजयी झाले. सत्तेवर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारमध्ये ते संसदीय कार्य आणि महिला बालकल्याणमंत्री झाले. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकले. त्या टर्ममध्ये ते सहकारमंत्री होते.
मात्र 2014 वेळी इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांना पहिल्यांदाच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी 11 ऑगस्ट 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, 2019 विधानसभेला पुन्हा दत्तात्रेय भरणेंकडून 3110 मतांनी पराभूत झाले.
आता पुन्हा हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा करत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.