सरकारनामा ब्यूरो
वेगवेगळ्या देशातील व्यापाराचे धोरण, विविध मुद्दांवर वाटाघाटी, निमंत्रणे, कराराबाबत चर्चा अशा अनेक कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरा करत असतात.
काही दिवसांपूर्वी पीएम मोदी अमेरिका आणि माॅरिशिअस दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान आलेल्या खर्चाचा हिशोब काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी संसदेत विचारला होता.
पीएम मोदींच्या गेल्या तीन वर्षाच्या दौऱ्यादरम्यान केलेली हाॅटेल व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि अन्य गोष्टीसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा हिशोब मल्लिकार्जुन खर्गेंनी मागितला होता.
गेल्या तीन वर्षात भारतीय दूतावासातून पीएम मोदींनी किती खर्च केला, याची महिती परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा यांनी गुरुवारी (ता.20) राज्यसभेत दिली.
पंतप्रधान मोदींनी 2022 च्या जर्मनी दौऱ्यापासून ते डिसेंबर 2024 यादरम्यान 38 परदेशी दौरे केले आहेत. याचा एकूण खर्च 258 कोटी रुपये इतका झाला आहे.
दिलेल्या माहितीनुसार, 2022 ला पीएम मोदी नेपाळ दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी 80,01,483 इतका खर्च, तर 2023 ला 17,19,33,356 इतका खर्च झाला होता.
2022 ला पंतप्रधान मोदी डेन्मार्क, फ्रान्स, यूएई, उझबेकिस्तान आणि इंडोनेशिया आणि 2023ला ऑस्ट्रेलिया, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या परदेशी दौऱ्यावर गेले होते.