Rajanand More
इस्त्राईल आणि अमेरिकेकडून इराणवर सातत्याने हल्ला केला जात आहे. इराणकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. पण या युध्दात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
इस्त्राईलकडून लेबनॉनवर हल्ल्यावेळी बंदी घालण्यात आलेल्या व्हाईट फॉस्फरसचा वापर केल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तब्बल ४०० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.
व्हाईट फॉस्फरस हे अत्यंत घातक स्फोटक मानले जाते. हे रसायन हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात. हे रसायन तब्बल ८१५ डिग्री सेल्सिअस अंशांपर्यंत तापमान निर्माण करते.
हे रसायन त्वचेवर पडल्यानंतर शरिरावरील मांस जळून ते हाडांपर्यंत पोहचते. जखमा भरून येत नाहीत. या रसायनामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे फुफ्फुस निकामी होण्याचा धोका असतो.
ह्युमन राईट्स वॉचने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्राईलने दक्षिण लेबनॉनमधीय योहमोर या निवासी भागात तोफांचा वापर करून व्हाईट फॉस्फरसचा मारा केला आहे. हल्ल्यावेळी तिथे किती लोक होते, याची माहिती समोर आलेली नाही.
लेबनॉन आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, हा हल्ला २ मार्च ते ८ मार्च या कालावधीत झाला असून यामध्ये ८३ लहान मुले आणि ४२ महिलांसह ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११३० लोक जखमी झाले आहे.
आरोग्य मंत्री राकान नासरेद्दीन यांनी या हल्ल्याला मानवी संकट असे म्हटले आहे. या हल्ल्याचा केवळ तात्कालिक परिणाम नसेल. भविष्यातही बचावलेल्या लोकांमध्ये अनेक आजार पसरण्याचा धोका आहे.
इस्त्राईलकडून दावा केला जातो की, व्हाईट फॉस्फरसचा वापर केवळ धूर निर्माण केला जातो. शत्रुपासून बचावण्यासाठी सैन्यदलाकडून त्याचा वापर केला जातो. पण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, निवासी भागात त्याचा वापर करण्यावर बंदी आहे.