Rajanand More
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुंमायू कबीर सध्या वादात अडकले आहेत. त्यांच्यामुळे बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.
कबीर यांनी शनिवारी मुर्शिदाबादमधील बेलडांगा येथेल बाबरी मशिदीची पायाभरणी केली. यावेळी तब्बल ८ लाख लोक उपस्थित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तृणमूलने निलंबित केल्यानंतर कबीर यांनी नवा पक्ष काढणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या २२ तारखेला त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीसाठी खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम या पक्षासोबत आघाडी करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षासोबत मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहे. त्यांच्या व्होट बँकेला छेद देण्याचा प्लॅन कबीर यांनी केल्याची चर्चा आहे.
ममता बॅनर्जी २०२६ नंतर मुख्यमंत्री राहणार नाही, असे भाकित वर्तवत कबीर यांनी यापूर्वीच त्यांना चॅलेंज दिले आहे. ओवेसी यांच्याशी युती करण्यामागे तृणमूलच्या मतांमध्ये विभाजन करण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात १३५ मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे सांगत त्यांनी निवडणुकीनंतर गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा केला आहे.
बाबरी मशिदीसाठी देशातील इंडस्ट्री मदत करेल. भारतात मुस्लिमांकडे खूप पैसा आहे. ते बाबरी मशिदीसाठी मदत करतील, असा विश्वास कबीर यांनी व्यक्त केला आहे.