Deepak Kulkarni
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. मराठवाड्यात तर विविध जिल्ह्यांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतकऱ्यांच्या घरांचं, पिकांचं आणि त्याचबरोबर जमिनींचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे.
घरं खचली, पाणी शिरलं, संसार वाहून गेला. यामुळे अनेक कुटुंबांवर आपल्याच भूमीत बेघर आणि हतबल होण्याची वेळ आली.
या हवालदिल नागरिकांचं सगळं लक्ष सरकारी मदतीवर आहे. पण समाजातील माणुसकी जपलेल्या अनेक व्यक्ती,सं स्था मदतीसाठी पुढे धावून आल्या आहेत.
मदतीच्या कार्यात प्रशासकीय अधिकारी...
या मदतीच्या कार्यात सामान्य कुटुंबातून पुढे येत प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे.
झारखंडमध्ये कार्यरत असलेल्या रमेश घोलप यांनी सामाजिक बांधिलकी जपत बार्शी तालुक्यातील पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी त्यांचा तीन महिन्यांचा पाच लाख रुपये पगार बार्शीतील नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला दिला आहे.
घोलप यांनी बार्शी तालुक्यातील कारी व दहीटणे या गावांतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेट देत प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. तसेच 30 शेतकऱ्यांना 10-10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले विशाल नाईकवाडे आणि मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त योगिता कोल्हे यांनीही पूरग्रस्त भागातील सुमारे 200 कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत दिली आहे. यांसह अनेक प्रशासकीय अधिकारी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.