Rashmi Mane
अंकिताच्या आईचं स्वप्न होतं की तिच्या मुलीने समाजसेवा करावी, लोकांसाठी काहीतरी वेगळं करावं. पण नशिबाने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं.
स्वप्न साकार होण्याआधीच आई गेली… आणि त्या क्षणी सगळं कोसळल्यासारखं झालं. तरीही, मुलीनं आईच्या आशीर्वादाने गगनभरारी घेतली. ही कहाणी आहे अंकिता चौधरीची.
अंकिता हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील साध्या कुटुंबातून आली. इंडस पब्लिक स्कूलमध्ये शिकताना ती नेहमीच हुशार विद्यार्थिनी होती. मेहनती, शांत आणि आत्मविश्वासू असं तिचं व्यक्तिमत्त्व होतं.
ग्रॅज्युएशनसाठी अंकितानं दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तिनं IIT दिल्लीमधून एम.एस्सी. पूर्ण केली. ह्याच काळात तिच्या मनात देशसेवेचं स्वप्न दृढ झालं अन् UPSCचा प्रवास इथूनच सुरू झाला.
आई शिक्षिका होती आणि नेहमी म्हणायची “समाजासाठी काहीतरी वेगळं कर!”
पण नियतीनं क्रूर खेळी खेळली. एका अपघातात आईचं निधन झालं. त्या घटनेनं अंकिताचं आयुष्य बदलून गेलं. पण तिनं ठरवलं – आईचं स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही.
आईच्या आठवणी मनात ठेवून, अश्रू पुसून तिनं पुन्हा पुस्तके उचलली. वडिलांनीही साथ दिली. संघर्ष होता, पण मनात एकच विचार “आईला अभिमान वाटेल अशी मी बनेन.”
2017 मध्ये अंकितानं पहिल्यांदा UPSC दिली, पण यश मिळालं नाही. अपयशानं तिनं हार मानली नाही, उलट अधिक बळ दिलं. तिनं दुसऱ्या प्रयत्नासाठी संपूर्ण लक्ष, वेळ आणि ऊर्जा अर्पण केली.
2018 मध्ये UPSC निकाल लागला… आणि अंकिताचं नाव देशभर गाजलं! तिनं ऑल इंडिया रँक 14 मिळवून आपलं स्वप्न साकार केलं. हरियाणा कॅडर मिळाला आणि ती झाली एक IAS अधिकारी.