Rashmi Mane
भारताच्या रेल्वे इतिहासात नवा अध्याय सुरू होत आहे. 17 जुलै रोजी देशातील पहिली हायड्रोजन फ्यूल-सेल ट्रेन सुरू झाली आहे, हरियाणातील जींद स्थानकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ‘ग्रीन ट्रेन’ला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
ही ट्रेन डिझेल किंवा ओव्हरहेड विद्युत तारांवर अवलंबून नाही. हायड्रोजनच्या मदतीने वीज निर्माण करून ट्रेन धावते. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक प्रक्रियेतून वीज तयार केली जाते. हीच वीज ट्रेन चालवण्यासाठी वापरली जाते. या प्रक्रियेत धूर निघत नाही, फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते.
10 डब्यांची ही आधुनिक ट्रेन जींद ते सोनीपत या सुमारे 90 किलोमीटर मार्गावर धावणार आहे. हा प्रवास सुमारे 2 तासांत पूर्ण होईल.
1200 किलोवॅट क्षमतेच्या प्रोपल्शन सिस्टिमवर चालणाऱ्या या ट्रेनचा कमाल वेग 75 किमी प्रतितास असेल. एका फेरीत 682 प्रवासी प्रवास करू शकतील.
ही ट्रेन दररोज दोन फेऱ्या मारणार असून सुमारे 356 किलोमीटर अंतर पार करेल. मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर ती थांबणार आहे.
जींद येथे विशेष हायड्रोजन फ्यूलिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे तयार केलेला हायड्रोजन उच्च दाबाच्या टाक्यांमध्ये साठवून ट्रेनमध्ये भरला जाणार आहे.
जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांसारख्या देशांनंतर आता भारतही हायड्रोजन ट्रेन चालवणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. हरित ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.