Amit Ujagare
लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (LPG) अर्थात घरातील स्वयंपाकाच्या गॅसचं भारतात उत्पादन खूप कमी प्रमाणत होतं. त्यामुळं परदेशातून आपल्याला गॅस आयात करावा लागतो.
आजवर अमेरिका-युएई हे भारताचे मुख्य पुरवठादार होते, पण अमेरिका-ईराण युद्धावेळी हॉर्मुजचा मुख्य मार्ग बंद झाल्यानं या दोन्ही देशांकडून होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता.
ऑगस्ट महिन्यात अमेरिकेनं भारताला सर्वाधिक गॅस पुरवला होता, तो म्हणजे ६ लाख २२ हजार ५३६ टन. तर संयुक्त अरब अमिरातीनं (युएई) १ लाख ४० हजार २६६ टन गॅस पुरवला होता.
त्यानंतर आता अल्जेरियानंही भारताला एलपीजी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यांत अल्जेरियानं भारताला १ लाख १०, ७११ टन गॅस पुरवला. त्यामुळं हा सर्वाधिक गॅस पुरवणारा तिसरा देश ठरला आहे.
भारतानं ऑगस्ट महिन्यात आयात केलेल्या एकूण १०.८ लाख टन गॅसपैकी अल्जेरियानं १० टक्के गॅसचा पुरवठा केला आहे.
अल्जेरियाची सरकारी कंपनी 'सोनाट्रॅक'नं ही युएईच्या 'अरामको' या कंपनीनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची गॅस निर्यातदार कंपनी आहे.
भारतासाठी गॅस पुरवठ्यासाठी मिळालेला हा तिसरा पार्टनर अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण भारत हा जगातील घरगुती वापरासाठी एलपीजी गॅस खरेदी करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे.
भारतात ३४ कोटी एलपीजीचे ग्राहक असून प्रत्येकवर्षी आपल्याला ३.३ कोटी टन एलपीजीची गरज भासते. यांपैकी ६५ टक्के गॅस हा परदेशातून आयात होतो. यावर भारत ११ अब्ज डॉलर खर्च करतो.
अल्जेरियामुळं भारताला तिसरा गॅस पुरवठादार मिळाला असला तरी त्यामुळं गॅसच्या किंमती कमी होण्याची शक्यता नाही. कारण गॅस कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारानुसार गॅसचे दर निश्चित करतात.