Rajanand More
काँग्रेसच्या सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा मोठ्या संकटात सापडले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्या भोवतीचा फास चांगलाच आवळला आहे.
ईडीने वाड्रा यांच्याविरोधात नव्याने आणखी एक आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये वाड्रा यांनी दोन कंपन्यांच्या माध्यमातून 58 कोटी रुपयांची अवैध कमाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अवैध कमाईतून वाड्रा यांनी विविध ठिकाणी संपत्ती खरेदी करण्यासाठी आणि आपल्या बिझनेसशी संबंधित कर्ज फेडण्यासाठी केल्याचा आरोपहीने ईडीने केला आहे.
ब्लू ब्रीज ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना अनुक्रमे 5 कोटी व 53 कोटी मिळाल्याचे ईडीने म्हटले आहे.
हरियाणातील शिकोहपूर गावांतील जमीन खरेदी-विक्री प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2018 मध्येच पोलिसांनी य्रपाकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर ईडीने यात उडी घेतली आहे.
वाड्रा यांच्यासह हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, डीएलएफ कंपनी आणि ओंकारेश्वर प्रापर्टीजसह अन्य काही जणांवर फसवणूक, षडयंत्र रचणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
स्कायलाई कंपनीने 15 कोटींची 3.5 एकर जमीन केवळ साडे सात कोटींमध्ये खरेदी केली. त्यानंतर हीच जमीन कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून डीएलएफ कंपनीला 58 कोटींमध्ये विकल्याचा आरोप आहे.
2006-08 मध्ये जमीन खरेदी, चुकीची माहिती देऊन मंजुरी मिळविण्यात आली. त्यानंतर 2012 पर्यंत डीएलएफला जमिनीची विक्री झाली. 2013 मध्ये व्यवहाराच्या ऑडिटमध्ये घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले.