Rajanand More
शाहनवाज खान हे आझाद हिंद सेनेमध्ये मेजर जनरल होते. भारताच्या फाळणीनंतर ते आपल्या कुटुंबाला सोडून भारतात आले आणि नंतर भारतीय राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या सरकारमध्ये खान यांना पहिल्यांदा रेल्वे आणि नंतर परिवहन राज्यमंत्री केले. जवळपास दोन दशके ते केंद्रात मंत्री होते.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965 मध्ये युध्द सुरू झाले, त्यावेळी खान हे भारतात केंद्रीय मंत्री होते. त्याचवेळी त्यांचा मुलगा पाक लष्करात मोठ्या हुद्द्यावर होता.
युध्द सुरू झाल्यानंतर भारतात खान यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली. दबाव वाढत गेल्याने त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली होती.
तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी खान यांचा बचाव करत राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. त्यांचा मुलगा शत्रूच्या सेनेत मोठा अधिकारी आहे, त्यात त्यांची चूक काय, असा सवाल शास्त्रींनी केला होता.
शाहनवाज यांचा जन्म एकसंध भारतातील रावळपिंडी येथे झाला होता. शिक्षणही तिथेच झाले. नंतर तर ब्रिटीश लष्करात अधिकारी झाले.
ब्रिटीशांची चाकरी सोडून देत खान यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. पुढे ते या सेनेत मेजर जनरल या पदावर पोहचले होते.
स्वतंत्र भारतामध्ये 1952 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर मेरठ मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर 1957, 1962 आणि 1971 असे तीनदा निवडून आले होते.