Rajanand More
आयपीएस अनुराग गुप्ता हे झारखंडचे पोलिस महासंचालक आहेत. त्यांच्या नियुक्तीवरून सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विभाग आणि झारखंड सरकार आमनेसामने उभे ठाकले आहे.
गुप्ता हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी सोरेन यांनी राज्यात नवी नियमावली आणल्याचे बोलले जाते.
गुप्ता हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार होते. पण त्याआधीच सोरेन यांनी पोलिस महासंचालक निवड व नियुक्ती नियमावली २०२५ तयार करून ती लागूही केली.
नव्या नियमावलीनुसार फेब्रुवारी महिन्यातच गुप्ता यांची दोन वर्षांसाठी पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
केंद्रीय गृह मंत्रालयातून सरकारला पत्र धाडून गुप्ता यांना ३० एप्रिलला निवृत्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण सरकारने नव्या नियमावलीचा आधार घेत हे आदेश मान्य केले नाहीत.
राज्याने दिलेली कारणे फेटाळून लावत गृह विभागाने ही नियुक्ती अवैध असल्याने गुप्ता यांना तातडीने निवृत्त करण्यात यावे, असे आदेश पुन्हा दुसरे पत्र पाठवून राज्याला दिले आहेत.
डीजीपींच्या नियुक्तीवरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने येण्याची बहुशी अशाप्रकारची ही पहिलीच घटना असावी, अशी चर्चा आहे.
गुप्ता यांना विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने पदावरून हटवले होते. यापूर्वीही एकदा त्यांचे निलंबन झाले होते. आता पुन्हा त्यांच्या नियुक्तीवर वाद निर्माण झाला आहे.