Rashmi Mane
उपराष्ट्रपतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
इच्छुक उमेदवार 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान आपले अर्ज दाखल करू शकतात. अर्जांची छाननी 22 ऑगस्ट रोजी होणार असून, 25 ऑगस्ट ही नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
मतदान प्रक्रिया 9 सप्टेंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडेल आणि त्याच दिवशी रात्री निकाल घोषित केले जाईल.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 66(1) नुसार, उपराष्ट्रपतीची निवड खासदारांच्या निर्वाचक मंडळाद्वारे केली जाते. यात लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व निवडून आलेले सदस्य आणि राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य यांचा समावेश होतो.
मात्र, या निवडणुकीत विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार (MLA) सहभागी होत नाहीत. मतदान गुप्त स्वरूपाचे (Secret Ballot) असते.
यात "Single Transferable Vote" प्रणालीचा वापर केला जातो, ज्या अंतर्गत मतदारांना उमेदवारांना प्राधान्यक्रमानुसार क्रमांक देण्याची मुभा असते.
या निवडणुकीसाठी एक विशेष निर्वाचक मंडळ तयार केले गेले असून, त्याची अद्ययावत यादी आयोगाने तयार केली आहे. ही यादी लवकरच जनतेसाठी आयोगाच्या कार्यालयात उपलब्ध करून दिली जाईल.
या निवडणुकीत सामान्य नागरिक मतदान करू शकत नाहीत. फक्त लोकसभा व राज्यसभा सदस्यांचाच सहभाग असतो. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज आहे.