Rajanand More
भारत आणि ब्रिटनदरम्यान गुरूवारी (ता. 24 जुलै) ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टेर्मर यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
या करारामुळे दोन्ही देशांमध्ये आयात-निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील कर म्हणजेच टेरिफ शून्य किंवा अत्यंत कमी असेल. त्यानुसार अनेक वस्तू स्वस्त तर काही वस्तू महागही होऊ शकतात.
भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या 90 टक्के उत्पादनांवरील टेरिफ अत्यंत कमी किंवा शून्य टक्के राहणार आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे.
करारामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, मरीन प्रोडक्ट्स, स्टील आणि मेटल, व्हिस्की, ज्वेलरी, औषधे, आदी वस्तूंसह अन्य काह वस्तूंच्या किंमती कमी होऊ शकतात. या वस्तू ब्रिटनमधून भारतात आयात केल्या जातात.
करारानुसार ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या काही वस्तूंवर टेरिफ लावला जाऊ शकतो. त्यामुळे या वस्तू महाग होऊ शकतात. त्यामध्ये कार, बाईक, वाहन उत्पादन, शेती उपकरणांचा समावेश आहे.
करारामुळे दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मजबूत होण्याबरोबरच रोजगाराच्याही अनेक संधी निर्माण होणार आहेत. त्याचप्रमाणे भारतात उद्योगांनाही बूस्टर मिळणार आहे. ब्रिटनसाठी भारताची बाजारपेठा खुली होणार आहे.
करारानंतर मोदी म्हणाले, भारतातील कृषी उत्पादने आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ब्रिटन बाजारपेठेत अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. भारतीय कपडे, चप्पल, दागिने, इंजिनिअरींग वस्तू आदींसाठीही ब्रिटनचा बाजार खुला होणार आहे.
या करारातून भारताने एक शक्तीशाली संदेश दिल्याचेही मोदी म्हणाले आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर दोन्ही देशांमधील व्यापक आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.