Jagdish Patil
टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
तर दुसरीकडे चीन-भारतामधील संबंध सुधारत आहेत. अशातच तब्बल 7 वर्षांनंतर PM नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर गेलेत.
ते तिआंजिनमध्ये दाखल झाले असून शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी झाले. यावेळी मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक बैठक पार पडली.
यावेळी जिनपिंग यांनी SCO शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल मोदींचे आभार मानले.
तर परस्पर विश्वास आणि संवेदनशीलतेच्या आधारावर दोन्ही देशातील संबंध पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं मोदी म्हणाले.
तसंच चीनला भेट देण्याचं निमंत्रण दिल्याबद्दल मोदींनी जिनपिंग यांचे आभार मानले.
यावेळी मोदींनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्याचं आणि दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे पुन्हा सुरू होत असल्याचं सांगितलं.
मोदी म्हणाले, "दोन्ही देशांच्या 2.8 अब्ज लोकांचे हित आमच्या सहकार्याशी जोडलेले आहे. यामुळे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्गही मोकळा होईल."
"मागील वर्षी कझानमध्ये यशस्वी चर्चा झाल्यामुळे आमच्या संबंधांना सकारात्मक दिशा मिळाली. सीमेवरून सैन्य मागे घेतल्यानंतर शांततेचे वातावरण निर्माण झालं."
"चीन-भारत या देशांना प्राचीन संस्कृती असून जग एका मोठ्या बदलाकडे वाटचाल करतंय. आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत."
एकमेकांच्या यशाला सक्षम करणारे चांगले शेजारी असणे आणि ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येणे हे खूप महत्वाचे आहे, असं शी जिनपिंग म्हणाले.