Rashmi Mane
भारताच्या रेल्वे इतिहासात एक महत्त्वपूर्ण घटना घडणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे.
508 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरमधून बुलेट ट्रेन महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेली मार्गे धावणार आहे. प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण होईल.
पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा ऑगस्ट 2027 मध्ये, दुसरा ठाणेपर्यंत 2028 मध्ये आणि अंतिम मुंबईपर्यंत 2029 मध्ये सुरू होईल.
एकूण 12 स्टेशन असलेल्या या मार्गावर 8 गुजरातमध्ये आणि 4 महाराष्ट्रात असतील. 320 किमी प्रतितास या अविश्वसनीय वेगाने धावणारी बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा प्रवास फक्त 3 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करेल.
या प्रकल्पाचे बांधकाम बुलेट स्पीडनेच सुरू आहे. आतापर्यंत 323 किमी वायडक्ट आणि 399 किमी पिअर तयार झाले आहेत. 211 किमी ट्रॅक बेड पूर्ण झाला असून 4 लाखांहून अधिक नॉइज बॅरियर्स बसवण्यात आले आहेत. 21 किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्यासह डोंगराळ भागातील टनेलचे कामही झपाट्याने सुरू आहे.
या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 1.08 लाख कोटी असून, त्यातील 81% निधी Japan International Cooperation Agency (JICA) कडून 50 वर्षांसाठी फक्त 0,1% व्याजदराने कर्जस्वरूपात मिळाला आहे. उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकार करत आहेत.
गुजरातमध्ये गेल्या 11 वर्षांत राज्यात 2,764 किमी नवी रेल्वे लाईन टाकली गेली आहे. बुलेट ट्रेनमुळे औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि पर्यावरणीय मानकांचा संगम असलेला हा प्रकल्प भारताच्या प्रगतीचा नवा प्रतीक ठरेल. ऑगस्ट 2027 मध्ये जेव्हा देशाची पहिली बुलेट ट्रेन रुळांवर धावेल, तेव्हा ती केवळ प्रवास नाही, तर भारताच्या वेगवान विकासाची नवी ओळख ठरणार आहे.