Rashmi Mane
भारताचे 14 वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला.
राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील किठाना या छोट्याशा गावात जन्मलेले धनखड हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर एक प्रतिभावंत वकील, शिक्षणप्रेमी आणि संविधानाचे गाढे अभ्यासकही होते.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जगदीप धनखड यांनी शालेय शिक्षणासाठी दररोज 4-5 किलोमीटर पायी चालत शाळेत जाण्याचा संघर्ष केला होता.
सैनिक शाळा, जयपूरच्या महाराजा कॉलेजमधील भौतिकशास्त्र पदवी आणि नंतर राजस्थान विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली होती.
पण अनेक लोकांना माहीत नसेल की धनखड यांनी IAS नोकरी न स्वीकारता वकिलीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात वकिली केली आणि फक्त 35 व्या वर्षी राजस्थान बार असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले.
राजकीय प्रवासातही त्यांनी विविध पक्षांमध्ये काम केलं. 1989 मध्ये जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आले आणि चंद्रशेखर सरकारमध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम केलं.
नंतर त्यांनी काँग्रेस आणि 2003 पासून भाजपचा भाग बनून काम सुरू ठेवलं. 2019 ते 2022 या काळात ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते, जिथे त्यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबतचे तणावपूर्ण संबंध सतत चर्चेत राहिले.
2022 मध्ये एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी त्यांची निवड झाली.
धनखड यांनी केवळ एका शेतकरी कुटुंबातून भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एक गाठले नाही, तर आपल्या वकिली, वैचारिक भूमिका आणि राजकीय अनुभवाच्या जोरावर देशाच्या राजकारणात एक प्रभावी स्थान निर्माण केलं.