Rajanand More
गुजरातमधील आयपीएस अधिकारी अभय चुडासामा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निवृत्तीच्या आठ महिने आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. सरकारने अद्याप राजीनामा स्वीकारलेला नाही.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. त्यांना मागील वर्षी अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर बढती मिळाली होती.
चुडासामा हे सध्या गांधीनगर येथील गुजरात पोलिस अकादमीचे प्राचार्य आहेत. त्यांना अडगळीतील पद दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.
चुडासामा यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात ते आरोपी होते. त्यांना 2010 मध्ये सीबीआयने अटकही झाली होती.
विशेष न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषमुक्त केले. तर हायकोर्टाने त्यांना 2014 मध्ये जामीन मंजूर केल्यानंतर सरकारने त्यांना पुन्हा सेवेत घेतले.
चुडासामा हे 1999 मध्ये गुजरात पोलिस दलात रुजू झाले होते. त्यांना 2004 मध्ये आयपीएस म्हणून बढती मिळाली.
सोहराबुद्दीन चुकमकीनंतर चुडासामा यांच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. 2014 मध्ये पुन्हा सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांना प्रत्येकवेळी साईड पोस्टिंग देण्यात आली.
नियमित सेवेनुसार ते ऑक्टोबर 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. पण काही महिने आधीच त्यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. याबाबत सरकारकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.