Rajanand More
उत्तर प्रदेशातील मेरठमधील २० वर्षीय ललिता गौतम या दलित मुलीच्या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. १५ मे रोजी परीक्षेसाठी घराबाहेर पडल्यानंतर ती परतलीच नाही. १७ मे रोजी तिचा मृतदेह आढळून आला.
आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंबेडकरी चळवळीतील संघटनांकडून आंदोलन करण्यात आले.
आंदोलन थांबविण्यासाठी एसएसपी अविनाश पांड्ये यांनी आंदोलकांना थोबाडीत मारल्याचा आणि पोलीस व्हॅनमध्ये एका वकिलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आंदोलक न हटल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावरून आता ललिता हत्याकांड प्रकरण चांगलेच तापले आहे. राज्यभरातील पांड्ये यांच्या कृतीवर अनेकांनी टीका केली आहे.
आयपीएस अधिकाऱ्याकडून झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच विरोधी पक्ष सरकारवर तुटून पडले आहे. पांड्ये यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
अविनाश पांड्ये हे २०१५ बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) ही पदवी मिळविली आहे.
उत्कृष्ट सेवेसाठी पांड्ये यांना ओळखले जाते. त्यांना या सेवेबद्दल डीजीपींचे रौप्य (२०२२) आणि सुवर्ण (२०२५) पदक मिळाले आहे.
पीलीभीतमधील खलिस्तानी दहशतवाद्यांच्या एन्काउंटर कारवाईमुळेही ते यापूर्वी चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा आंदोलकांना मारहाण केल्याने वाद निर्माण झाला आहे.