Rajanand More
IPS जगमोहन मीणा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मागील काही वर्षांत सेवेचा राजीनामा दिलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीत आता त्यांचेही नाव समाविष्ट झाले आहे.
मीणा हे ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी असून अद्याप सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. सध्या ते भुवनेश्वर येथे उप-पोलीस आयुक्त (DCP) म्हणून कार्यरत आहेत.
केवळ ३७ वर्षे वय असलेल्या जगमोहन मीणा यांनी १३ वर्षे भारतीय पोलीस सेवेत काम केले आहे. कमी वयातच राजीनामा दिल्याने ओडिशा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मीणा यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मीणा हे १३ वर्षांच्या सेवाकाळात माओवादीविरोधी मोहिमांमध्ये सक्रिय सहभागी होते. तसेच अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत आपली कर्तबगारी सिध्द केली आहे.
जगमोहन मीणा यांनी मलकानगिरी, अंगुल, गंजम या जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी कटक येथे डीसीपी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
मूळचे राजस्थानातील सिकर येथील असलेले मीणा IIT चे पदवीधर आहेत. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी क्रॅक करत पोलीस दलात प्रवेश केला.
मीणा यांनी १३ वर्षांच्या सेवेत पोलीस शौर्य पदक, पोलीस अंतर्गत सुरक्षा सेवा पदक, राज्यपाल पदक अशी पदके मिळविली आहेत. त्यामुळे पोलीस दलात त्यांचे सातत्याने कौतुक होत असे. आता राजीनाम्यानंतर ते पुढे काय करणार, याबाबत उत्सुकता आहे.