Rajanand More
तामिळनाडू पोलीस दलातील आयपीएस अधिकारी आर. व्ही. रम्या भारती यांचा खळखळून हसण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांचं हेच असणं वादात सापडलं आहे.
एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याची घटना कोईम्बतूर येथे घडली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर माहिती देण्यासाठी भारती यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली.
याच पत्रकार परिषदेतील रम्या भारती आणि आणखी एका पुरूष अधिकाऱ्याचा खळखळून हसण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका गंभीर विषयावरील पत्रकार परिषदेत अशाप्रकारे हसण्यावरून लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
रम्या भारती यांचे हसण्यामुळे पोलीस दलाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. त्यामुळे तमिळनाडू पोलीस दलातही नाराजी निर्माण झाली आहे.
रम्या भारती या सध्या तामिळनाडूच्या वेस्ट झोनच्या महानिरीक्षक पदावर आहेत. याअंतर्गत कोईम्बतूर, तिरुप्पूर, निलगिरी, सलेम, इरोड, नमक्कल, धर्मपुरी आणि कृष्णागिरी असे आठ जिल्हे येतात.
IPS रम्या या २००८ च्या तुकडीच्या तमिळनाडू केडरच्या अधिकारी आहेत. त्या १ सप्टेंबर २००८ रोजी आयपीएस सेवेत रुजू झाल्या आहेत. त्या उच्चशिक्षित असून सायबर क्राईममध्ये एमएसस्सी पदवी मिळविली आहे.
आपल्या १८ वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. पोलीस अधिक्षक, पोलीस आयुक्त, या पदांसह ड्रग्ज तस्करी, समुद्री तटरक्षक, नक्षलवाद अशा संवेदनशील प्रकरणांवरही त्यांनी काम केले आहे.
रम्या भारती या केंद्र सरकारच्या सेवेतही काही काळ होत्या. त्यांनी नागरी उड्डाण मंत्रालयात ब्यूरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटीमध्ये उपमहासंचालक पदावर काम केले आहे.