Rajanand More
मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूमध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर इतिहास घडला आहे. कल्लाकुरिची जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेत दलितांसाठी मंदिर प्रवेशाचा मार्ग खुला केला.
कुराल गावातील श्री कलियुग श्रीनिवासन पेरुमल मंदिरात प्रवेश करण्यापासून आदि द्रविड समाजातील लोकांना रोखले जात होते. आता त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला आहे.
कल्लाकुरिचीच्या पोलीस अधीक्षक शहनाज इलियास यांनी त्यासाठी अर्थक परिश्रम केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक होत असून नुकतेच विजय सरकारमधील मंत्री वन्नी अरसु यांनी त्यांचा सन्मानही केला.
कल्लाकुरिची जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे दोन प्रमुख अधिकारी महिला आहेत. जिल्हाधिकारी जे. ई. पद्मजा असून पोलीस अधीक्षक शहनाज इलियास या आहेत. पद्मजा यांच्या मदतीने त्यांनी हा बदल केला आहे.
जिल्ह्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ३०.५६ टक्के एवढी आहे. तसेच यापैकी मोठी संख्या ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे याठिकाणी धार्मिक बाबींना अधिक महत्व आहे.
शहनाज इलियास या २०२१ बॅचच्या आयपीएस अधिकारी असून, त्यांनी २०२० च्या UPSC परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली असून, महाविद्यालयानंतर सुमारे पाच वर्षे आयटी क्षेत्रात कामही केले होते.
पोलीस अधिक्षकचा पदभार स्वीकारण्यापूर्वी शहनाज इलियास या चेन्नईमध्ये सायबर क्राइम विभागात एसपी-१ पदावर कार्यरत होते. तिथेही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली होती.
IPS शहनाज यांनी गर्भवती असताना UPSC परीक्षेची तयारी केली होती. त्यांना पहिल्याच प्रयत्नात यशही मिळाले. त्यामुळे त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक झाले.