Rajanand More
अमेरिका आणि इस्त्राईलने संयुक्तपणे इराणवर मागील तीन दिवसांपासून हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयतोल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराण आक्रमक झाला आहे.
इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. केवळ इस्त्राईलच नव्हे तर तब्बल १० देशांवर क्षेपणास्त्र डागत आपली ताकद दाखवून दिली आहे. प्रामुख्याने अमेरिकेला विविधप्रकारे मदत करणाऱ्या देशांना लक्ष्य करण्यात आले आले.
इराणकडून इस्त्राईलला प्रामुख्याने टार्गेट केले जात आहे. क्षेपणास्त्र, ड्रोनचा जोरदार मारा केला जात आहे. इस्त्राईलच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावरही हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे.
इराणने संयुक्त अरब अमिरातीतील प्रामुख्याने दुबईवर हल्ला चढविला. यूएईवर तब्बल १६५ बॅलेस्टिक आणि दोन क्रूझ क्षेपणास्त्र तसेच ५४१ ड्रोन डागली. प्रसिध्द हॉटेल बुर्ज अल अरबमध्येही आग लागली होती.
आखाती देशांतील ओमान आणि कतारवरही इराण हल्ले चढविले. ओमानमधील दुकम बंदराचे नुकसान झाले आहे. काही जहाजांनाही लक्ष्य करण्यात आले. कतारमधील अमेरिकी एअरबेसवर हल्ला करण्यात आला.
बहरीनमधील अमेरिकेचे नौदलाच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागण्यात आले. परिसरातील तीन इमारतींचे मोठे नुकसान. कुवेतमध्ये इराणच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नुकसान. इराणकडून ९७ क्षेपणास्त्रांचा मारा.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रियाद आणि पूर्वेकडील भागात इराणकडून क्षेपणास्त्र डागण्यात आली. बहुतेक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आली.
जॉर्डनवर ४९ ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाईल डागण्यात आली. तर इराकमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाला इराणने लक्ष्य केले. प्रामुख्याने अमेरिकेचा एअरबेस टार्गेट होते.
इराणने सीरियालाही सोडले नाही. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात स्वेदा शहरातील चार लोकांचा मृत्यू. काही नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.