Jagdish Patil
इटलीमध्ये महागाई आणि युद्धाविरोधात काढलेल्या मोर्चादरम्यान अनेक शहरांमध्ये हिंसाचार झाला.
मिलानमध्ये मास्क घातलेल्या काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत दुकानांची लूटमार आणि जाळपोळही केली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
आंदोलनाची सुरुवात शांततेत झाली होती. मात्र, काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने संघर्षाला सुरुवात झाली.
परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी मोर्चा मध्येच थांबवला आणि 50 आंदोलकांना ताब्यात घेतले.
हिंसाचारानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये पोलिसांच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.
इटलीतील इतर शहरांमध्येही तणावाची परिस्थिती असून बोलोन्यामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे स्टेशन बंद ठेवली.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हिंसाचाराचा निषेध केला.
शांततेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांचा आदर आहे; मात्र हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.