Rashmi Mane
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे अभ्यासू, प्रश्नांची जाण असलेले, हजरजबाबी आणि प्रतिस्पर्ध्यांची हसताखेळता फिरकी घेणारे नेते म्हणून राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांचे पुत्र असूनही त्यांनी स्वतंत्र राजकीय वाटचाल घडवली.
1984 मध्ये वडिलांचे आकस्मिक निधन झाले, त्यावेळी जयंत पाटील अमेरिकेत न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शिक्षण घेत होते.
वडीलांच्या निधनामुळे त्यांना तातडीने भारतात येऊन त्यांनी राजकारणात पाऊल ठेवावे लागले. वडील राजारामबापू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले होते. त्यामुळे जयंत पाटलांना घरातून राजकारणाचं बाळकडू मिळाला होता.
वयाच्या 28व्या वर्षी म्हणजे 1990 मध्ये पहिल्यांदा इस्लामपूर वळवा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले. त्यानंतरच्या आठही निवडणुकांत त्यांनी विजय मिळवला.
राज्याच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ग्रामविकास, गृह आणि अर्थमंत्री म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
1999 ते 2008 पर्यंत ते राज्याचे अर्थमंत्री होते. आर.आर. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.
विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळापासून ते उद्धव ठाकरे सरकारपर्यंत विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.