Rajanand More
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी (ता. 2 सप्टेंबर) आपली लेक के. कविता यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे तेलंगणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
के. कविता यांनी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांवर वडिलांविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आऱोप केला होता. या आरोपांमुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या कविता यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा देत पक्षापासून कायमचे दूर जाण्याचा निर्णय जाहीर केला.
पक्षात आपल्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याची माहिती बंधू केटीआर यांना दिली होती. पण त्यांनीही दुर्लक्ष केल्याचे सांगताना कविता भावूक झाल्या होत्या.
वडील केसीआर आणि पक्ष कार्यकर्त्यांची काळजी घेण्याचे आवाहन कविता यांनी बंधू केटीआर यांना केले आहे. दोघांविरोधात पक्षात षडयंत्र रचले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
के. कविता या तेलंगणा जागृती या संघटनेच्या माध्यमातूनही राज्यात कार्य़रत आहेत. या संघटनेच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यामाध्यमातून राजकारणात सक्रीय राहण्याचे संकेतही त्यांनी दिले.
के. कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली होती. त्या काही महिने तिहार जेलमध्ये होत्या. सध्या त्या जामीनावर बाहेर आहेत.
कविता यांना अटक झाल्यापासूनच त्यांच्याविरोधात पक्षात नाराजी होती. त्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ही नाराजी वाढत गेल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी ज्येष्ठ नेत्यांवर टीका केल्याने त्यांना पक्षातूनच बाहेर जावे लागले आहे.