Rajanand More
महुआ मोइत्रा या तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालमधील खासदार आहे. 'पैशांच्या बदल्यात प्रश्न' प्रकरणी त्यांची खासदारकी रद्द झाली होती. पण त्या पुन्हा निवडून आल्या आहेत.
महुआ मोइत्रा या त्यांच्या विधानांमुळे अनेकदा वादात अडकल्या आहेत. प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर त्या सातत्याने टीका करतात.
तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यासोबतचा त्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच दोघांमध्ये खडाजंगी झाली होती.
कल्याण बॅनर्जी हेही त्यांच्या कृतीमुळे आणि विधानांमुळे वाद ओढवून घेतात. त्यांनी लोकसभेत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना लेडी किलर म्हटले होते. त्यावरून त्यांनी माफीही मागितली होती.
महुआ यांनी आयोगाला भेटायला जाणाऱ्या शिष्टमंडळात आपले नाव नसल्याचा जाब बॅनर्जी यांना विचारला होता. वाद समोर आल्यानंतर बॅनर्जी यांनी त्यांना असंस्कृत आणि असभ्य म्हटले आहे. त्यामुळे आता दोघांमधील वाद टोकाला गेला आहे.
बॅनर्जी यांनी महुआ यांना व्हर्सटाईल इंटरनॅशनल लेडी असे म्हणत टीका केली आहे. आपल्याला अटक करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपण चूक केल्याचे म्हटल्यास कायमचे राजकारण सोडू, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
बॅनर्जी यांच्या टीकेनंतर तसेच वाद चव्हाट्यावर आल्यानंतर महुआ मोइत्रा यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्या काय बोलणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.