Rajanand More
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील २८ वर्षीय कॅरोलिन लेविट या महिलेने अचानक नोकरीचा राजीनामा दिल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. एवढी चर्चा होण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे आपण पाहूयात.
कॅरोलिन लेविट या व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी होत्या. त्यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या विश्वासू सहकारी मानल्या जात होत्या.
आपल्या दोन लहान मुलांना अधिक वेळ देता यावा, यासाठी नोकरी सोडल्याचे लेविट यांनी म्हटले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्या काही दिवसांपूर्वीच मातृरजेवरून पुन्हा नोकरीवर परतल्या होत्या.
लेविट या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत तरुण व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी ठरल्या होत्या. वयाच्या पंचविशीतच त्यांच्या खांद्यावर थेट व्हाईट हाऊसमधील प्रेसची जबाबदारी पडली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२४ च्या निवडणूक प्रचारात लेविट यांनी राष्ट्रीय प्रेस सेक्रेटरी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्या आतापर्यंत ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी होत्या.
व्हाईट हाऊसमधील कामाच्या ताणामुळे त्यांना मुलांकडे अपेक्षित लक्ष देणे शक्य होत नव्हते. विशेष म्हणजे करिअर आणि मुलांचा सांभाळ याबाबत त्यांनी काही दिवसांपूर्वीच सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती.
मुलीच्या जन्मानंतर मातृरजेवरून परतल्यावर लेविट यांनी नोकरी आणि मातृत्वाच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळणे कठीण जात असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनीही त्यांचा निर्णय मान्य करत त्यांच्यावर सल्लागार म्हणून जबाबदारी देण्याबाबत संकेत दिले आहेत.
लेविट यांच्या राजीनाम्यानंतर अमेरिकेसह जगभरात महिलांसाठी करिअर आणि पालकत्व यामध्ये समतोल साधण्याच्या आव्हानावर चर्चा झडू लागल्या आहेत.