Rajanand More
केरळमधील अभिनेत्री रिनी जॉर्ज हिने एका नेत्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. हा नेता आपल्याला मागील तीन वर्षांपासून अश्लिल मेसेज पाठवून त्रास देत असल्याचा दावा तिने केला आहे.
अभिनेत्रीने संबंधित नेत्याचे नाव जाहीर केले नसले तरी भाजपने थेट काँग्रेसचे आमदार व केरळ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहुल मनकूटाथिल यांच्याकडे बोट दाखविले आहे.
आरोपानंतर भाजपने मनकुटाथिल यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर आणखी काही महिलांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली.
या आरोपांनंतर मनकुटाथिल यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील नेत्यांनीच त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.
राजीनामा देताना त्यांनी आरोप फेटाळले आहेत. या गोष्टीमुळे राजीनामा देत नसून पक्षाला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी पद सोडत असल्याचे ते म्हणाले.
रिनी यांनी आरोप केले होते की, एका युवा नेत्याकडून आपल्याला अश्लील मेसेज पाठविले जातात. मला फाईव्ह स्टार हॉटेलवर बोलविण्यात आले. मानसिक त्रास देण्यात आला.
संबंधित नेत्यांची तक्रार पक्षाती नेत्यांकडे करण्यात आली होती. पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट महत्वाची पदे दिली. त्यामुळे आपण माध्यमांसमोर आल्याचे रिनी यांनी सांगितले.
रिनी यांच्यानंतर लेखिका हनी भास्करन यांनी आरोप केले. आमदारांनी आपल्यालाही सातत्याने मेसेज पाठविले. त्यानंतर इतरांसमोर या संवादाबाबत चुकीचा समज पसरवला, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस पक्षातील नेत्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. गंभीर तक्रार आता समोर आली आहे. त्यांनी चूक केली असेल तर नक्की कारवाई होईल. त्यांना पक्षासाठीचे त्यांचे काम पाहून पद देण्यात आले होते.