Rajanand More
'एनडीए'ने उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते मुळचे तमिळनाडूचे आहेत.
राधाकृष्णन यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून राज्यसभेचे खासदार तिरुची शिवा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ते तमिळनाडूतील सत्ताधारी डीएमके पक्षाचे नेते आहेत.
तिरुची शिवा यांची राज्यसभेची ही चौथी टर्म आहे. १९९६ पासून ते राज्यसभेत आहेत. डीएमकेमध्ये मागील अनेक वर्षांपासून सक्रीय असून पक्षातील वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर त्यावेळी सरकारच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या तिरुची शिवा यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यावेळी ते डीएमकेच्या युवा संघटनेत कार्यरत होते.
तिरुची शिवा यांचे दिल्लीतही सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. डीएमकेचे दिल्लीतील धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये त्यांचा शब्द महत्वाचा मानला जातो.
तिरुची शिवा यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याचा डीएमकेचा आग्रह असल्याचे समजते. राधाकृष्णन यांच्याविरोधात तेच योग्य उमेदवार असतील, असा दावा केला जात आहे.
काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर राजकीय पक्षांकडूनही पसंती दिली जाऊ शकते. ते ज्येष्ठ नेते असून तमिळनाडूतील राजकीय गणिते पाहता त्यांना सर्वसंमती मिळू शकते.
राधाकृष्णन यांच्याविरोधात शिवा यांच्यासह कोणताही उमेदवार असला तरी त्यांचा पराभव निश्चित आहे. एनडीएकडे पुरेसे संख्याबळ असून इतर काही पक्षांचाही पाठिंबा मिळत आहे.