Jagdish Patil
'खालिद का शिवाजी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे.
काल मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी करत काही लोकांनी या चित्रपटाला विरोध केला.
शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत काही वादग्रस्त मांडणी केल्याचा आरोप करत हिंदू महासंघाने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलेय.
या चित्रपटावर श्री शिवशंभू विचार मंचानेही आक्षेप घेतलाय. चित्रपटात ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आणि खोटे दावे केल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.
संघटनेचे राज्य संयोजक सुधीर थोरात म्हणाले, खालिद का शिवाजी या सिनेमात चुकीचे ऐतिहासिक संदर्भ देण्यात आलेत.
महाराजांच्या सैन्यात 35 % मुसलमान होते, महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते शिवाय रायगडावर मशिद बांधली, असा चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवला आहे.
त्यामुळे चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी ठोस पुरावे दिल्याशिवाय शासनाने हा चित्रपट प्रदर्शीत करू नये. शिवाय ट्रेलरमधेच इतके दोष असतील तर संपूर्ण चित्रपट हा समाजाची वैचारिक दिशाभूल करणारा असेल, असं थोरात म्हणाले.
तर, महंत सुधीर दास महाराजांनी शासनाने या चित्रपटांवर बंदी घालावी. आम्ही या चित्रपटाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, कुणाच्या भावना दुखावणं किंवा चुकीचा इतिहास दाखवणं हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे CBFC नं याबाबतचा फेरविचार करावा, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.