Aslam Shanedivan
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी ऐतिहासिक वाघनखं आता कोल्हापुरात पाहता येणार आहेत.
शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाअंतर्गत शिवकालीन वाघनखं कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस याठिकाणी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून तीन वर्षांसाठी ही वाघनखं भारतात आणण्यात आली असून कोल्हापुरात ती शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनात 28 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांपर्यंत असतील.
याचे उदघाट्न सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उद्घाटन ऑनलाईन माध्यमातून केले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह खासदार शाहू छत्रपती महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयेन एस, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, उपसंचालक हेमंत दळवी तसेच मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
शिवछत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांच्या वापरातील वाघनखे महाराष्ट्रातील जनतेला पाहता यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वस्तुसंग्रहालय आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून ही वाघनखं भारतात आणण्यात आली आहेत. सातारा आणि नागपूरनंतर ही वाघनखे कोल्हापुरात आता आणण्यात आली आहेत.
या प्रदर्शनात 235 शिवकालीन शस्त्रे दांडपट्टा, तलवारी, ढाली, भाले, बर्चे, वाघनखे इत्यादी नागरिकांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
हे प्रदर्शन आठ महिन्यांपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी खुले राहणार असून, जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि संरक्षण तज्ज्ञांच्या सहाय्याने शिवकालीन इतिहासाशी निगडित विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.