Amit Ujagare
तेलंगणातील काँग्रेस सरकारमध्ये एक मोठी घडामोड नुकतीच पाहायला मिळाली. यामुळं त्याची राष्ट्रीय राजकारणात चर्चा सुरु आहे.
रेवंथ रेड्डी यांच्या सरकारमधील महिला मंत्री कोंडा सुरेखा यांची मुलगी कोंडा सुस्मिता हीनं मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानं कोंडा यांच्यावर मंत्रीपद गमवायची वेळ आली.
कोंडा सुरेखा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून केली. २००९ मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या आणि दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण मंत्री म्हणून काम केलं.
वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या तेलंगणा राष्ट्र समिती (TRS, सध्याची BRS) पक्षात सामील झाल्या आणि वारंगल पूर्वमधून विजयी झाल्या.
२०१८ मध्ये मतभेदांमुळे त्यांनी टीआरएस सोडले आणि पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर त्यांना रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले.
त्यांचा विवाह तेलंगणातील प्रभावी नेते आणि माजी विधान परिषद सदस्य (MLC) कोंडा मुरली यांच्याशी झाला आहे. त्यांच्या राजकीय संघर्षावर आणि वैवाहिक प्रवासावर आधारित राम गोपाल वर्मा यांनी 'कोंडा' नावाचा चित्रपटही बनवला आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये, कोंडा सुरेखा यांनी दाक्षिणात्य अभिनेते नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाबाबत केलेल्या एका विधानामुळे मोठे राजकीय आणि सिनेमॅटिक वादळ उठले होते.
तेलंगणा काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय घडामोडी आणि कुटुंबातील सदस्यांच्या राजकीय भूमिकांमुळे त्या वारंवार राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत.