Jagdish Patil
पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, शिक्षण महर्षी, मावळ भूषण अशी ओळख असलेले माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कृष्णराव भेगडे यांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता ते जाणून घेऊया.
10 ऑगस्ट 1936 रोजी तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंबात जन्म झालेले कृष्णराव भेगडे यांनी मावळ तालुक्याचा कायापालट केला.
त्यांनी मावळ विधानसभा मतदारसंघाचे 2 वेळा प्रतिनिधित्व केले. तसंच ते विधान परिषदेवरही दोनदा निवडून गेले होते. शरद पवारांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख शेवटपर्यंत कायम राहिली.
त्यांनी 1967 साली जनसंघाकडून विधानसभा लढवली. मात्र, यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1972 च्या निवडणुकीत मात्र ते विजयी झाले..
1976 मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर ते पुन्हा 1978 मध्ये ते आमदार झाले. मात्र, 1980 सालच्या विधानसभेतील पराभवानंतर त्यांची वर्णी विधान परिषदेवर लागली.
1992 साली ते विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र, शरद पवार संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यात येऊन मुख्यमंत्री बनले. यावेळी पवारांसाठी भेगडेंनी राजीनामा दिला. त्यानंतर 1994 पुन्हा त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आलं.
1994 ची टर्म संपल्यानंतर भेगडेंनी 2000 साली राजकारणातून निवृत्ती घेतली. ते राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात 50 वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते.