Rashmi Mane
नेपालमध्ये अनेक दिवस चाललेल्या हिंसक आंदोलनानंतर आता परिस्थिती थोडी शांत झाली आहे. जेन-जी पिढीचे आंदोलनकर्ते आता नवी सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत.
अंतरिम पंतप्रधानपदासाठी अनेक नावांची चर्चा होत असताना सध्या सर्वात पुढे असलेले नाव म्हणजे कुलमान घिसिंग यांचे आहे.
सुरुवातीला काठमांडूचे महापौर बालेन शाह आणि माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांची नावे आघाडीवर होते.
मात्र, बालेन शाह यांनी माघार घेतली आणि सुशीला कार्की यांचे वय व कायदेशीर अडचणींमुळे त्यांचे नाव बाजूला पडले. त्यामुळे आता 54 वर्षीय कुलमान घिसिंग यांचं नाव सध्या चर्चेत आहे.
कुलमान घिसिंग हे नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीचे (NEA) माजी प्रमुख आहेत. देशातील वीज व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणल्याचे श्रेय त्यांना दिले जाते. अनेक वर्षे काठमांडू खोऱ्यात कायम असलेली लोडशेडिंग त्यांनी आपल्या कार्यकाळात संपवली.
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1970 रोजी रामेछाप जिल्ह्यातील बेथन येथे झाला. त्यांनी भारतातील जमशेदपूर येथील क्षेत्रीय प्रौद्योगिकी संस्थानातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
नंतर काठमांडूच्या पुलचौक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. याशिवाय त्यांनी एमबीए करून व्यवस्थापन क्षेत्रातही आपले कौशल्य विकसित केले.
1994 मध्ये ते एनईएमध्ये अभियंता म्हणून रुजू झाले आणि पुढे कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि नेतृत्वगुण यांच्या जोरावर ते वीज मंडळाचे प्रमुख बनले.