Rashmi Mane
लाडकी बहीण योजनेत राज्यभरातील लाखो महिलांना लाभ मिळत आहे. मात्र, या योजनेतून पुढेही लाभ घेण्यासाठी सरकारने सर्व लाभार्थींना KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
केवायसी करण्यासाठी लाभार्थी महिलांना त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे केवायसी करणे आवश्यक आहे. पण, अनेक महिलांचे पती किंवा वडील हयात नसल्याने तसेच काही घटस्फोटित महिलांसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या महिलांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. मात्र, केवायसी करण्यासाठी आता केवळ 5 दिवस उरले असतांना सरकारने अखेर यावर मोठा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले, की ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत, त्यांच्यासाठी आता केवायसी प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.
अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर एक नवीन पर्याय (ऑप्शन) उपलब्ध करून दिला जाणार आहे. या नवीन पर्यायामध्ये संबंधित महिला पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate) अपलोड करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
तसेच घटस्फोटित महिलांना घटस्फोटाचा दाखला (Divorce Certificate) अपलोड करण्याची सुविधा दिली जाणार आहे.
महिला आणि बालविकास विभागाच्या म्हणण्यानुसार, या दस्तऐवजांच्या आधारे संबंधित लाभार्थ्यांची पडताळणी सोपी होईल आणि त्यांना योजनेचा लाभ अखंडितपणे मिळत राहील.
केवायसी प्रक्रिया 18 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक. पती किंवा वडील हयात नसल्यास वेबसाइटवरील नवीन ऑप्शनद्वारे प्रमाणपत्र अपलोड करावे. घटस्फोटित महिलांनी घटस्फोटाचा दाखला जोडावा.