Rashmi Mane
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी अनिवार्य असलेल्या ‘ई-केवायसी’ प्रक्रियेची मुदत 18 नोव्हेंबरला संपत आहे.
मात्र अजूनही राज्यातील सुमारे 1 कोटी 10 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे इतक्या मोठ्या संख्येतील महिलांची नाराजी सरकारला परवडणारी नाही.
त्यामुळे निवडणुका होईपर्यंत ‘ई-केवायसी’ला मुदतवाढ मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही महत्त्वाची योजना सुरू केली होती. योजनेच्या घोषणेनंतर तब्बल 2 कोटी 59 लाख महिलांनी अर्ज केले व 1 जुलैपासून त्यांना लाभ देण्यात आला.
मात्र, पडताळणी झाल्यानंतर चारचाकी वाहन धारक, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, वयोमर्यादा न पाळणाऱ्या, शासकीय कर्मचारी महिला, पुरुष अर्जदार, तसेच इतर वैयक्तिक योजनांचे लाभ घेणारे असे एकूण अंदाजे 50 लाख जण यादीतून वगळले गेले.
सध्याचे अंदाजे लाभार्थी महिलांची संख्या 2.9 कोटीवर आली आहे. ‘ई-केवायसी’ प्रक्रियेदरम्यान वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ बंद होणार असल्याची भीती अनेक महिलांमध्ये आहे.
या भीतीपोटी काही महिलांनी जाणूनबुजून KYC प्रक्रिया टाळली आहे. तसेच आधारकार्डला जोडलेला मोबाईल क्रमांक बंद असणे, नव्याने क्रमांक लिंक करण्याची गरज आहे.
पती किंवा वडील नसलेल्या महिलांची पडताळणी राहणे अशा तांत्रिक अडचणींमुळेही अनेक लाभार्थी अडकल्या आहेत. त्यामुळे सरकारकडून मुदतवाढ मिळणे निश्चित असल्याचे प्रशासनातील सूत्रे सांगतात.