Rashmi Mane
सातारा जिल्ह्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. या योजनेच्या फेरतपासणीत तब्बल 84 हजार 13 महिलांनी उत्पन्न मर्यादा ओलांडूनही लाभ घेतल्याचे समोर आले.
जून 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात होते. परंतु, अपात्र महिलांनी वर्षभरात मिळून तब्बल 151 कोटी 22 लाख रुपयांचा लाभ घेतल्याचे शासनाच्या तपासात उघड झाले.
ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झाल्याने अर्जांची काटेकोर तपासणी न होता मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे एकाच घरात तिघींना मिळतोय लाभ. आता अपात्र दोघांचा लाभ बंद होणार आहे.
यामध्ये उच्च उत्पन्न असलेले कुटुंब, शासकीय योजनांचा आधीच लाभ घेणाऱ्या महिला, चारचाकी वाहनधारक, तसेच 21 ते 65 वर्षे वयोगटाबाहेरील महिलांचा समावेश आहे.
शासनाने आवाहन केल्यानंतर जिल्ह्यातील 125 महिलांनी स्वतःहून योजना सोडली. मात्र, उर्वरितांनी गैरफायदा घेणे सुरूच ठेवले. जिल्ह्यात एकूण 8,33,237 अर्जांपैकी 7,49,099 अर्ज पात्र ठरले, तर 84,013 अर्ज अपात्र ठरले आहेत.
सरकारचा मोठा निधी या योजनेत अडकून राहिल्याने विकासकामांवर परिणाम झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आता शासनाने कठोर पावले उचलत अपात्र लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात चूक अपात्र महिलांची की निवडणूकपूर्व घाईची यावरून चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी अपात्र लाभार्थी यादीबाहेर जाण्याची शक्यता आहे.