Aslam Shanedivan
राज्य सरकारच्या लोकप्रिय 'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील शालेय मुलींसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने 7 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी 'लाडकी विद्यार्थिनी योजना' जाहीर केली आहे.
याची घोषणा महापौर अश्विनी निकम यांनी केली असून, यामुळे मुलींच्या शिक्षणाला बळ मिळणार आहे. तसेच शहरातील हजारो गोरगरीब विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे.
या योजनेतून पात्र मुलींना दरमहा 500 रुपयांची आर्थिक मदत DBT द्वारे विद्यार्थिनींच्या बँक खात्यात दिली जाणार आहे.
दरम्यान या योजनेच्या नावावरून सध्या महायुतीत कलह निर्माण झाला असून शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
शिवसेनेने कडून योजनेसाठी माजी आमदार दिवंगत ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असून भाजपने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव सुचवले आहे.
सध्या या योजनेवरून महायुतीमधील अंतर्गत वाद आता चांगलाच टोकाला गेला असून, अंतिम तोडगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे काढतील असे बोलले जात आहे.