Rajanand More
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे पुन्हा आजोबा बनले आहेत. त्यांचे पुत्र व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यांनी नुकताच मुलाला जन्म दिला आहे.
लालू यादव व राबडी यादव यांनीच आपल्या नातवाचे नामकरण केले आहे. त्यांनी नातवाला ‘इराज’ हे नाव दिले आहे. सोशल मीडियात पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली. तसेच यामागचे कारणही सांगितले आहे.
लालूंनी इराज नाव दिल्यानंतर तेजस्वी व त्यांच्या पत्नीने इराज या नावापुढे आपल्या वडिलांच्या नावातील पहिला शब्द लालू जोडला आहे. त्यांना मुलाचे नामकरण ‘इराज लालू यादव’ असे केले आहे.
लालूंनी सोशल मीडियात पोस्ट करून सांगितले आहे की, नवरात्रात कात्यायनी अष्टमीदिवशी जन्मलेल्या नातीचे नाव कात्यायनी ठेवले होते.
बजरंग बलीच्या पावनदिनी म्हणजे मंगळवारी जन्मलेल्या नातवाचे नाव ‘इराज’ ठेवल्याची माहिती लालू प्रसाद यादव यांनी दिली आहे.
इराज हा एक संस्कृत शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ होतात. त्याचा एक अर्थ भगवान हनुमानही आहे. त्यांना पवन देवाचे पुत्र मानले जाते, त्यामुळे त्यांना ‘इराज’ असेही म्हटले जाते.
इराजचा अर्थ फूल, आनंद, पाण्यापासून उत्पन्न होणारा असाही होतो. हे शब्द सकारात्मक ऊर्जेचे प्रतिक मानले जातात.
इराजचा जन्म कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात झाला आहे. सध्या यादव कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून आनंदाचे वातावरण आहे. लालूंनी सर्वांचे आभार मानले आहेत.