Ganesh Sonawane
लेक लाडकी योजनेच्या अर्ज प्रक्रियेत सरकारने मोठा बदल केला असून आता पालकांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पात्र लाभार्थ्यांसाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवरून अर्ज करता येणार असून कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रियेत आधारच्या माध्यमातून लाभार्थी मुलीची माहिती घेतली जाणार आहे.
मुलगी, तिची आई आणि वडिलांचे ई-केवायसी करण्यात येणार असून त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे.
योजनेचा लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर लाभाची रक्कम मिळवण्यासाठी पालकांना पुन्हा स्वतंत्र प्रक्रिया किंवा अर्ज करण्याची गरज राहणार नाही.
लेक लाडकी योजनेत पात्र मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून 5,000 रुपये दिले जातील.
त्यानंतर इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर 6,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.
मुलीने इयत्ता सहावीत प्रवेश घेतल्यावर 7,000 रुपये, तर इयत्ता अकरावीत प्रवेश घेतल्यावर 8,000 रुपये मिळतील. म्हणजे शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर सरकारकडून मुलीला आर्थिक आधार दिला जाणार आहे.
मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये मिळणार असून सर्व टप्प्यांवर मिळून एकूण 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत मिळेल. या योजनेचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आहे.
1 एप्रिल 2023 पासून पात्र ठरलेल्या मुलींना 15 ऑगस्ट 2027 पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र नव्याने जन्मलेल्या मुलीच्या बाबतीत जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे, तसेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आणि सरकारच्या उत्पन्नासह इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत 2,98,695 लाभार्थींना पहिला हप्ता मिळाला आहे; अर्ज प्रक्रिया सोपी झाल्याने अधिक पात्र मुलींना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.