Roshan More
भाजपच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे 100 व्या वर्षात पदार्पण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
8 नोव्हेंबर 1927 रोजी अडवाणी यांचा जन्म कराची येथे झाा. फाळणीनंतर अडवाणी कुटुंब भारतात आले.
1942 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. पुढे संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केले आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला.
1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाल्यानंतर अडवाणी पक्षाच्या कामात सक्रिय झाले. संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपली ओळख निर्माण केली.
1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत अडवाणी यांनी पक्ष संघटनेच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली. 1986 मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
25 सप्टेंबर 1990 रोजी गुजरातमधील सोमनाथ येथून अयोध्येसाठी राम रथयात्रेला सुरुवात केली. या यात्रेमुळे अडवाणी राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. यात्रेदरम्यान काही भागांत जातीय तणाव आणि हिंसाचाराच्या घटनाही घडल्या.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अडवाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम केले. 2002 ते 2004 या काळात त्यांनी देशाचे उपपंतप्रधानपदही सांभाळले.
31 मार्च 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आलेले ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.